ऊस लागवडीचे महत्व, जमीन निवड व पूर्व मशागत – भाग -02 Preparation of Land for Sugarcane Cultivation

पूर्व हंगाम आणि सुरू हंगाम ऊस लागवडीचे महत्व, जमीन निवड व पूर्व मशागत

पूर्व विदर्भात ऊस पिकवणार्‍या शेतकरी वर्गात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यात ऊस पिकाचे एकरी 80 ते 100 टन उत्पन्न हे एक आव्हानच आहे. यासाठी ऊस ऊत्पादनासाठी होणारा एकरी खर्च कमी करून, आहे त्या क्षेत्रातच ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्याने हे आव्हान नक्कीच पेलू शकतो.

यासाठी ऊस पिकाचे नियोजन, शेतकामात सातत्य आणि त्याची काटेकोर अमलबजावणी करणे ही खरी गरज आहे. ऊस शेतीतील बारकावे समजून घेऊन ऊस शेती करण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

आपल्या पूर्व विदर्भात साखर उद्योग हा एक महत्त्वाचा शेती उद्योग झाला आहे. ऊस हे आपल्या भागातील शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली तर ऊसपिक हे एक शाश्‍वत उत्त्पन्न देणारे आणि विक्रीमूल्याची हमी असणारे असे आहे. या पिकाच्या आर्थिक उलाढालीमुळे पूर्व विदर्भात एकूण ग्रामीण जीवनावर लक्षणीय बदल झालेला आहे, होत आहे.

आपल्या भागात भौगोलिक परिस्थिती ऊस लागवडीस अनुकूल आहे. या कारणाने अवर्षणग्रस्त वर्षांचा विचार बाजूस ठेवल्यास ह्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येते. ऊस शेतीतील नवीन तंत्रांचा  वापर करून त्यात सातत्य ठेवल्यास शेतकरी 80 ते 100 टन उसाचे उत्पादन काढू शकेल यात काही शंका नाही.

यासाठी ऊस ऊत्पादनासाठी होणारा एकरी खर्च कमी करून आहे त्या क्षेत्रातच ऊसाचे आणि त्याबरोबरच साखरेचे उत्पादन वाढवणे ही आजची खरी गरज आहे, असे ऊसपिकाचे नियोजन ठेवावे लागेल. ते अमलात आणण्यासाठी ऊस शेती ही काटेकोरपद्धतीनेच करावी लागेल. या बरोबरच जमिनीची सुपीकताही कशी वाढवता, ठेवता येईल याकडेही लक्ष द्यावे लागेल.

ऊसाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट :

पूर्व आणि सुरू हंगाम ऊसपिकाचे हेक्टरी सरासरी उत्त्पन्न 100 मे. टन येते, म्हणजेच प्रत्येक हेक्टरमधून गळीत योग्य असे 1,00,000 ऊस मिळतात. याप्रमाणे ऊसाचे सरासरी वजन 1 किलो असते.

ऊसपीक त्याचा पसारा आणि ज्या क्षेत्रावर ते घेतले आहे त्याचे क्षेत्रफळ इत्यादी विचारात घेतल्यास दोन सरींतील म्हणजेच ऊसाच्या दोन ओळींतील आणि ऊसाच्या रोप अथवा लागवडीची टिपरी यांच्या अंतराचे योग्य गणित ठेवल्यास गळीतयोग्य अशा ऊसाचे सरासरी वजन 2 किलो वा त्याहूनही अधिक मिळवणे शक्य आहे.

See also  ऑनलाईन मोफत मराठी पुस्तके - List of 5 free websites

याचे मूळ आहे ते रोपास किंवा टिपरीच्या कोंबास येणाऱ्या फुटव्यांच्या संख्येत. ही संख्या योग्य व अपेक्षित असे नियोजन करून ती राखण्यात यश मिळाले तर एक हेक्टर क्षेत्रामधून 200 ते 250 मे. टन व त्याहूनही अधिक ऊस उत्पादन मिळवणे शक्य आहे.

यासाठी शेतकऱ्याना उत्पादनाचे हे उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून काटेकोरपणे पूर्व आणि सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी काम करावे लागतील.

या हंगामातील ऊस सर्वसाधारणपणे 12 ते 14 महिने कालावधीचा असतो.  हे पीक तंत्रशुद्ध पद्धतीने घ्यावयाचे झाल्यास ज्या क्षेत्रास बारामाही पाणीपुरवठा होतो असे क्षेत्र या पिकासाठी निवडणे योग्य. 

महत्त्वाचे फायदे आहेत-

  • पूर्व हंगाम चा ऊस हा ऊन्हाळ्यात साधारण 5 ते 7 कांड्यांवर असते. यावेळी हवेतील शुष्कता आणि जमिनीतील पाण्याचा ताण सहन करण्याची या पिकाची क्षमता चांगली असते.
  • या पूर्व हंगाम पिकाची तोडणी साखर कारखाने नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात करतात. याचा फायदा पुढील खोडवा पिकास होतो. खोडवा पिकाचे उत्त्पन्न चांगले येते.
  • रुंद सरी पद्धतीने  लागवड करून (कमीतकमी 5 फूट वा जास्त) ऊसाच्या दोन ओळींमध्ये प्रारंभीच योग्य नियोजन करून आपल्या जवळच्या बाजारास योग्य अशा कमी काळात तयार होणारी नगदी आंतरपिके घेता येतात. ऊस पिकाच्या सर्व क्षेत्रातून मध्यावधीतच मिळणारा हा आर्थिक फायदा एकूण उत्पन्नात वाढच करतो.
  • जुलै ते सप्टेंबर हा कालावधी भर पावसाचा असल्याने पाण्याची गरज कमी असते. त्यामुळे एकूण पाणी-खर्चात बचत होते.
  • आंतरपीक म्हणून हरभरा व डाळ वर्गीय पीक तसेच हिरवळीचे पीक घेतल्यास जमिनीची भौतिक रासायनिक आणि जैविक सुपीकता वाढते.
  • पूर्व हंगाम या पिकाच्या लागवडीचा कालावधी साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर तसेच सुरू हंगाम हा डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत आहे.(जास्तीत जास्त 15 मार्च) हे पीक सुमारे 12 ते 14 महिने शेतात राहते. या ऊस पीक प्रकाराचे सरासरी हेक्टरी उत्त्पन्न 100 ते 150 मे. टन येते. या पिकाची लागवड प्रामुख्याने नागपूर, वर्धा तसेच भंडारा जिल्ह्यांतील  शेतकरी प्राधान्याने या हंगामच्या ऊसाची लागवड करतात.
See also  जी ट्वेंटी परिषद महत्वाचे प्रश्न 2023 G20 summit important questions 2023 in Marathi

हवामान :

ऊस लागवड व वाढीच्या हंगामात त्याला हवामान ऊष्ण व दमट ओलसर लागते. वर सांगितल्याप्रमाणे पिकास बारमाही पाण्याचीही सोय असावी. ऊस पक्व होऊन त्यात साखर होण्यासाठी थंड व कोरडी हवा या हंगामातील  पिकास त्याच्या 8 ते 11 व्या महिनेनंतर मिळू लागते. त्याचा फायदा ऊसाचे उत्त्पन्न वाढण्यावर होतो.

जमीन :

ऊसाच्या लागवडीसाठी भारी जमीन अथवा मध्यम मगदुराची असावी. जमिनीची खोली सुमारे 60 ते 120 सें.मी. असावी व जमीन सपाट असावी. जमिनीला असमान पृष्ठभाग असेल तर पाणथळ भागातून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी चर काढावेत. पूर्वमशागत चालू करण्यापूर्वी मातीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवावेत. माती परीक्षणाच्या आधारे पिकास द्यावयाची खतमात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्ये, भूसुधारके, पाणी इत्यादींचे काटेकोर वेळापत्रक आखावे व त्याचा अवलंब करावा.

पूर्वमशागत :

ऊसाची त्याच्या पूर्ण वाढीच्या अवस्थेत एकसारखी जोमदार वाढ होण्यासाठी पिकाच्या मुळाची वाढ, विस्तार आणि अन्नपाणी शोषणाची मुळांची कार्यक्षमता सतत उत्तम राहायला हवी.

ऊस पिकाच्या मुळ्या जमिनीत 60 सें.मी.पेक्षाही जास्त खोल जातात व पसरतात. एकूण मुळ्याच्या शंभरापैकी 70 टक्के मुळ्या या पिकाच्या बुडख्याच्या अवती भवती व जमिनीच्या वरच्या 30 सें.मी.च्या पृष्ठभागावरच कार्यरत असतात.

यासाठी जमिनीची प्रथम उभी व त्यानंतर त्यास आडवी खोल नांगरट करावी. त्यानंतर 15 ते 30 दिवस जमीन चांगली तापू द्यावी. दुसऱ्या नांगरटीच्या आधी एकरी 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, साखर कारखान्याची मळी लागवडीच्या क्षेत्रात एकसारखे पसरावे.

आडवा उभा रोटावेटर चालवावा. ढेकळे चांगली बारीक होतील याची काळजी घ्यावी. जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर त्यावर लोड (वजन असलेले लाकडी / लोखंडी औजार) फिरवून जमीन सपाटीस आणावी.

सरी पाडणे :

पारंपरिक ऊस लागवड पद्धतीत अडीच ते तीन फूट रुंदीची सरी व तीन डोळ्याच्या टिपरीची जोड लागवडही सरसकट पद्धती अवलंबली जात होती. परंतु यातील तोटे शेतकर्‍रांनी तसेच कारखान्याचे कृषी विभागाने चाणाक्षपणे ओळखून वेळीच रुंद सरी, दोन डोळ्यांचे टिपरे, दिड फूट अथवा दोन फूट अंतरावर रोप लावणे याकडे शेतकरी वळले आहेत. प्राधान्राने ह्या पद्धती ते सध्या वापरत आहेत.

See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवसा विषयी माहीती - World food safety day information in Marathi

पारंपरिक  ऊस लागवड पद्धतीत तोटे जास्त होते. मोठ्या बांधणीनंतर ऊसात आत शिरता येत नाही. या कारणाने पाणी व्यवस्थापन, किडीचे व्यवस्थापन नीट होत नाही. पिकास म्हणजे जमिनीत पाण्याचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे जमिनी पाणथळ, क्षारवट झाल्या व होत आहेत. यावर उपाय म्हणून खालील पद्धतीचा अवलंब करावा.

लांब सरी पद्धत :

मध्यम व हलक्या जमिनीत चार फूट अंतरावर व भारी ते कमीत कमी निचऱ्याच्या जमिनीत 5 ते 6 फूट अंतरावर ट्रॅक्टरच्या अथवा बैल रिजरच्या साहायाने जमिनीच्या उतारास आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी 100 फूट ते 120 फूट ठेवावी. त्यानुसार पाटपाण्याचे पाट काढावेत.

पानांमध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या माध्यमातून उपलब्ध सूर्यप्रकाशाचे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करणारे ऊस हे पीक असून, सूर्यप्रकाश आणि पानांमधील हरितद्रव्य यांच्या प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेमधून जास्तीत जास्त कार्यक्षमतेने अन्नद्रव्ये (ऊर्जा) तयार करण्याची अतिउच्च क्षमता ऊस पिकात आहे.

पानांमधील हरितद्रव्ये जेवढी दीर्घ कालावधीसाठी व पूर्ण क्षमतेनुसार काम करतील तेवढे अन्नद्रव्य जास्त प्रमाणात तयार होईल म्हणजे ऊसाची पाने जेवढी मोकळी, एकावर एक घन आच्छादन केलेली, दीर्घकाल हिरवी असणारी, जेवढी रुंद असतील तेवढी अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमताही वाढेल.

ऊसपिकाच्या उत्तम ऊत्पादनासाठी या नमूद केलेल्या सर्व बाबींचे शेतात प्रत्यक्षात अवलंबन म्हणजेच ऊसाच्या दोन ओळींतील अंतराचे, दोन रोप किंवा बेणे टिपरी लागवडीतील अंतर यांचे तंत्रशुद्ध व काटेकोर नियोजन होय.

हे जर व्यवस्थित समजावून घेतले, शेतात केले, प्रत्यक्ष अनुभवले, तर पारंपरिक ऊस लागवडीपेक्षा सुधारित तंत्राची लागवड नेहमीच एकरी जास्त उत्पादन देते.

संकलन : अनंत जुगेले -कृषी अधिकारी

1 thought on “ऊस लागवडीचे महत्व, जमीन निवड व पूर्व मशागत – भाग -02 Preparation of Land for Sugarcane Cultivation”

Leave a Comment