शेवगा लागवड – Moringa Cultivation Maharashtra

शेवगा लागवड

शेवगा (Moringa) हे एक अल्प कालावधीत अल्पखर्चात अत्यल्प पाण्यात शाश्‍वत उत्पादन देणारे भाजीपीक आहे ,शेवगा पानांत ‘अ* जीवनसत्व पुरेसे असते. ,शेवगा पानामध्ये गाजराच्या चारपट जीवनसत्व ‘अ’ , संत्र्याच्या सातपटजीवनसत्व ‘क’, दुधाच्या चारपट कॅल्शियम व दुप्पट प्रथिने आणि केळीपेक्षा तीन पट पोटॅशियम असते. शेवगा पानाचा रस हे एक उत्तम टॉनिक आहे. शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा व शेवगा शेंगाची भाजी यात अँन्टिबायोटिक्स सारखी प्रतिजैविके असतात. त्यामुळे घसा व त्वचारोग बरे होतात. त्यांच्या सेवनाने रक्‍ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.

तसेच बियांपासूनचे तेळ सांधेदुखीवर उपचार म्हणून वापरले जाते. वाळलेल्या बियांपासून घन स्वरूपाचे तेल निघते. या स्वच्छ, रंगहीन व घट्ट तेलाला ‘बेन ऑईल’ म्हणतात त्याचा उपयोग घड्याळात वंगण म्हणून करतात.

शेवग्याचे झाड बहुवर्षीय असून इतर झाडांप्रमाणे कणखर किंवा कठीण खोडाचे नाही.

शेवगा लागवडही पुढीस काही महत्वाच्या बाबीमुळे खुप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शेवगा हे पिक हलक्या माळरान जमीनीत तथा बांधावरीही उत्तम प्रकारे येते.

 • कोरडवाहू फळझाडात एक उत्तम आंतरपिक म्हणून शेवगा चांगले उत्पादन देतो.
 • निर्यातक्षम पीक म्हणून शेवग्याला व्यापारी दृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले आहे
 • तुलनेने इतर पिकापेक्षा दर एकरी शेवगा लागवड खर्च अत्यंत कमी आहे.
 • लागवडीपासून १५ ते २० वर्षांपर्यंत चांगले पीक घेता येते, त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या लागवड खर्च वाचतो

युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, आखाती देश व आशियाई देश इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इतर भाज्यांप्रमाणेच शेवग्याच्या निर्यातीला खूपच वाव आहे. सध्या शेवगा निर्यातीबाबतच मानके निश्‍चित केलेली नाहीत. तरीसुद्धा पसंती आणि मागणी लक्षात घेता निर्यातीसाठी खालीलप्रमाणे मानके (स्टॅण्डर्ड)

 • शेगांचा रंग आकर्षक हिरवा गडद हिरवा असावा.
 • शेंगा मध्यम लांबीच्या ३० ते ४५ सें.मी., मध्यम जाडीच्या आणि गोल आकाराच्या असाव्यात. अधिक लांबीच्या किंवा आखूड शेंगा पसंतीला उतरत नाहीत.
 • शेंगा चविष्ट, स्वादिष्ट तसेच गराचे प्रमाण जास्त म्हणजे भरीव असाव्यात. बियांची संख्या कमी असावी तसेच बिया कठीण नसाव्यात.
 • शेंगांतील गर मऊ आणि चविष्ट (गोड) असावा परंतु तुरट किंवा कडवट नसावा.,साल पातळ असावी.
 • शेंगा कोवळ्या, लुसलुशीत असाव्यात परंतु जून झालेल्या नसाव्यात.
 • माती लागून खराब झालेल्या नसाव्यात.
 • शेंगांवर रोगट ठिपके आणि किडीचा प्रादुर्भाव झालेला नसावा.
 • शेंगांची टिकाऊ क्षमता अधिक असावी.
 • निर्यातक्षम उत्पादनासाठी सेंद्रीय खतांचा अधिक वापर झालेला असावा,

जमीन

 • हलक्या जमिनीपासून मध्यम ते भारी जमीन पिकाला मानवते,
 • पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी.
 • पाणी साचणाऱ्या जमिनीत लागवड यशस्वी होत नाही. सेंद्रिय अंश अधिक असलेली जमीन उपयुक्‍त असते. जमिनींचा सामू (पी.एच.) ५.५ ते ७.५ असावा.
 • खडकाळ जमीन लागवडीस योग्य नाही. शेताच्याबांधावरही शेवग्याची लागवड करता येते.

लागवड

 • शेवग्याची लागवड रोपे किंवा छाट कलमे, खुंट लावून केली जाते. पारंपरिक पद्धतीत लागवड ही जातिपरत्वे ४ x ४ मीटर किंवा ५ x५ मीटर अंतरावर करतात .
 • मात्र आधुनिक लागवड पद्धतीत दोन रांगेतील आणि रांगेमधील दोन झाडांमधील अंतर २ ते २.५ मीटर
 • (२ x २ मी. किंवा २.५ x २.५ मी.) ठेवतात .
 • अशा प्रकारे झाडांची संख्या हेक्‍टरी १६०० ते २५०० (अति दाट लागवड पद्धत) राखावी.
 • अशा प्रकारच्या लागवडीमध्ये झाडांची दरवर्षी छाटणी करावी.
 • लागवड जास्त कालावधीसाठी ठेवायची असल्यास योग्य कालावधीनंतर झाडांची विरळणी करावी म्हणजे झाडांच्या फांद्यांची गर्दी होऊन वाढीवर तसेच शेंगा धरण्यावर, आकारावर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार नाही. त्यासाठी
 • दोन्ही बाजूंनी एका रांगेतील झाडे काढून टाकावीत आणि त्यामधील अंतर ४ x४ मी. किंवा ५ x५ मी रखावे लागवडीसाठी खड्डा ४५ x४५x४५से मी  खोदावा
 • खडयात ५ किलो कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत आणि स्फुरदयुक्त खत १ किलो मातीत मिसळून खड्डा निम्मा भरावा.
 • रोपांची किंवा छाट कलमाची (खुंटाची) लागवड करावी. रोपे जोमदार ५० ते १०० सें.मी. उंचीची आणि ४५ ते ६० दिवस वयाची लावावीत. लागवडीनंतर खड्डा पूर्ण भरावा. वाऱ्याने झाडे मोडू नयेत म्हणून त्वरित काठीने आधार द्यावा.

खत व्यवस्थपान

 • शेवग्याला दरवर्षी शेंगा लागत असतात. चांगल्या वाढीसाठी आणि दर्जेदार शेंगांसाठी झाडांना दरवर्षी योग्य प्रमाणात खते द्यावीत.
 • सेंद्रिय खते अधिक प्रमाणात द्यावीत. पहिल्या वर्षी ५ किलो शेणखत, २५ ग्रॅम नत्र, २० ग्रॅम स्फुरद आणि २५ ग्रॅम पालाश प्रति झाडास द्यावे.
 • ही मात्रा झाडाच्या वयानुसार वाढवावी. पाचव्या वर्षी प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, १२५ ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि १२५ ग्रॅम पालाश द्यावे.
 • खते बांगडी पद्धतीने पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये द्यावीत. लागवडीतील झाडांच्या संख्येनुसार हेक्‍टरी खतांची मात्रा निश्‍चित करावी.

पाणी व्यवस्थापन

 • शेवगा हे कोरडवाहू (पावसाच्या पाण्यावर वाढणारे) झाड आहे. परंतु अधिक उत्पादनासाठी पाणी देणे फायदेशीर ठरते.
 • हिवाळी आणि उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुराप्रमाणे आठवड्यातून १ किंवा २ आठवड्यांच्याअंतराने पाणी देणे पुरेसे होते.
 • व्यापारी दृष्ट्या लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे अधिक फायदेशीर असते.

झाडांची छाटणी आणि आकार देणे :

moringa

 • शेवग्याच्या झाडांची वाढ जलद गतीने होत असते. रोपांची उंची भरमसाठ याढते. म्हणून झाडांना योग्य आकार प्राप्त होण्यासाठी छाटणी करणे जरुरीचे आहे.
 • उंची मर्यादित ठेवून शेंगांची काढणी सुलभतेने करता येते.
 • शेंगांचा दर्जा सुधारून उत्पादनात वाढ होते. लागवडीच्या पहिल्या वर्षी २ ते ३ महिन्याने साधारणपणे १ मी. उंचीवर खोडाची छाटणी करावी.
 • त्यानंतर शेंगांची काढणी केल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांमध्ये फांद्यांची दुसऱ्यांदा छाटणी करावी. पुढील काळात झाडांची छाटणी दरवर्षी एकदा करावी.
 • कमकुवत फांद्या छाटून टाकाव्यात. इतर फांद्या मजबूत आणि सशक्त (स्ट्राँग) बनतील अशी काळजी घ्यावी. आवश्यक त्या मुख्य फांद्या राखून बाकी छाटणी करावी.

पीक संरक्षण

 • खोड व फांद्या पोखरणारी अळी : या अळीच्या प्रादुर्भाव विशेषत: मोठया व जून झाडावर आढळून येतो. अळी खोड पोखरून आत
 • शिरते. झाड कमकुवत होऊन उत्पादनात घट होते. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या बुंध्याजवळ अळीने बाहेर टाकलेली विष्ठा व भुसा दिसून येतो. अशा छिद्रात रोगार किंवा डायक्लोरोवास कीटकनाशकाच्या कापसाचा बोळा ठेवावा व तोंड बंद करावे. यामुळे आतील अळी मरते.
 • पाने गुंडाळणारी अळी आणि नागअळी : ही अळी शेवग्याची पाने कुरतडून खाते. यासाठी २ मि.ली. मोनोक्रोटोफॉस १ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • कॅन्कर : या रोगाच्या प्रादुर्भाव नवीन रोपांवर जून ते ऑगस्ट महिन्यात आढळतो. यामुळे रोपाची मोठ्या प्रमाणावर मर होते. या रोगावर बाविस्टीन (०.१ टक्के) तसेच बोर्डोमिश्रण (०.२५ टक्के) प्रभावी आढळले आहे.
 • मर : मर रोग टाळण्यासाठी बिया पेरणीआधी कार्बेन्डेझिमच्या (०.१ टक्के) द्रावणात २४ तास बुडवून ठेवाव्यात. तसेच रोपे उगवून आल्यानंतर १० दिवसांच्या अंतराने चार फवारण्या कराव्यात.

पिकाचा हंगाम आणि काढणी

moringa harvesting

 • प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये फुले आणि शेंगा धरण्यास सुरुवात होते आणि मे-जून पर्यंत शेंगा लागतात.
 • काही जातीच्या शेंगा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काढणीस तयार होतात तर काहींच्या मार्च-एप्रिल- मे मध्ये तयार होतात.
 • कोवळ्या शेंगांची तोडणी करावी. कोवळ्या शेंगा आकाराने गोल, गर्द हिरव्या रंगाच्या, आकर्षक आणि लुसलुशीत अशा असाव्यात.
 • शेंगांची काढणी उशिरा झाल्यास त्या जून आणि कठीण होऊन भाजीसाठी निरुपयोगी ठरतात.
 • शेंगा फांदीपासून अलगद तोडाव्यात. शेंगा तसेच फांद्या मोडणार नाहीत किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • शेंगांची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. आकार आणिसंख्येनुसार शेंगांची वेगवेगळी बंडल (जुड्या) करावेत. पॅकिंग चांगल्या प्रकारे करावे.

उत्पादन

 • उत्पन्न हे जातीवर आणि मशागतीवर अवलंबून राहते. सर्वसाधारणपणे पहिल्या वर्षी उत्पादन कमी मिळते. पुढील वर्षापासून उत्पादन वाढीव मिळते.
 • सुधारीत जातीच्या लागवडीपासून ९ ते १५ टन प्रती हेक्‍टरी उत्पादन मिळते.

Information source – Agri Department Maharashtra

Leave a Comment