ऊस लागवड पद्धत – भाग -06- Sugarcane cultivation Methods

ऊस लागवड पद्धत – Sugarcane cultivation Methods

बेनेद्वारे

  • उसाची लागवड करताना दोन सरीतील अंतर किमान 5 फूट ठेवून सरींच्या लांबी उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी. ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
  • एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर 30. सें.मी ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागवडीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व वाफशा आल्यावर लागवड करावी.
  • दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन   टिप-यांमधील अंतर 15 ते 20 सें.मी. ठेवावी. यासाठी ओल्या पध्दतीने लागवड केली तरी चालेल.
  • मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत व डोळा बाजूला राहील याची काळजी घ्यावी. लागवडी साठी भारी जमिनीसाठी एकरी 10000 व मध्यम जमिनीसाठी 12000 टिपरी लागतात.

ऊस रोपांपासून

  1. ऊस लागवडी करीता शेतकऱ्यांनी स्वतः गादीवाफ्यावर किंवा ट्रे कोकोपीट चा वापर करून रोप तयार करून लागवड केल्यास उत्पादन खर्चात काही बचत होते.
  2. काही शेतकरी तयार ऊस रोपांची मागणी कारखान्याच्या कृषी विभाग च्या गट कार्यालयात  नोंदवतात. अश्या शेतकऱ्यांना मानस उद्योग समूह आपल्याच भागातील प्रगतशील शेतकऱ्यांकडून तज्ञांच्या मार्गदर्शनात ऊस रोप तयार करवून घेऊन शेतकऱ्यांना एकरी 6000 रोप (पाच फूट X दिड फूट अंतर) पुरवठा करते. प्लॅस्टिक ट्रे मध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 25 ते 35 दिवसांची झाल्यावर जमिनीत लागवडीयोग्य होतात.
  3. ट्रे मधे ऊस बेणे लावणीपूर्वी 100 लिटर पाणी + 300 मि.ली.मेलॅथिऑन + 100 ग्रॅम बाविस्टीनची 20 मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करतात. यामुळे बुरशीजन्यरोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो. असेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खतांचे प्रमाण  अनुक्रमे 100 मिली  आणि 100 मिली प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिप-या 30 मिनीटे बुडवून लागवड करतात,  त्यामुळे नत्राची 50 टक्के बचत होते.
  4. काही शेतकरी एक महिन्याच्या रोपांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करतात. उसाची रोपे 25-35 दिवस कोकोपीटमध्ये वाढविलेली असतात. त्यामुळे आपणास शुध्द निरोगी ऊस रोपे  येतात.
  5. उत्कृष्ट रोपे लागवडीस वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पीक वाढते, एकरी ऊसांची संख्या 35 ते 45 हजार मिळते. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन 2 ते 3 किलोपर्यत मिळते. रोप लागवड पध्दतीत नेहमीच्या लागवडीस 25 ते 35 दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तणनियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते.
  6. काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो त्यामुळे वेळेवर लागवड करता येत नाही. अशा वेळेस ऊस रोपे लागवड करुन वेळेवर हंगाम साधता येतो. ऊसाच्या दोन ओळीतील अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते

संकलन :- अनंत जुगेले

              कृषी अधिकारीए

1 thought on “ऊस लागवड पद्धत – भाग -06- Sugarcane cultivation Methods”

Leave a Comment